Weird Marriage : जुन्या काळात एका राजाला अनेक राण्या असायच्या. अनेक कथा, मालिका आणि सिनेमांमधून तुम्ही हे वाचलं-ऐकलं असेलच. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत जो आजच्या काळातील असूनही त्याला सहा बायका आहेत. हे वाचून तुम्ही हैराण नक्कीच झाले असाल, पण हे सत्य आहे. आंध्र प्रदेशच्या मंगलागिरीमध्ये राहणारा अदापा शिव शंकर बाबूने सहा लग्ने केली आणि सर्व बायका वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना एकमेकींबाबत काहीच माहीत नाही.
काही दिवसांनी त्याच्या पहिल्या पत्नीला पतीवर संशय आला आणि तिने पतीचा मोबाइल चेक केला. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यानंतर तिने पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्तीला 6 बायका आहेत. तपासातून जे समोर आलं ते बघितल्यावर तर पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी खुलासा करताना सांगितलं की, त्याची कोणतीच पत्नी एकमेकींना ओळखत नाही. संशय असा आहे की, या व्यक्तीच्या आणखीही बायका असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मॅट्रिमोनिअल साइट्सवर कमजोर घटस्फोटीत महिलांना आपली शिकार बनवत होता. आरोपी स्वत:ला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून परिचय देत होता. आरोपी महिलांना आपल्या गोडगोड बोलण्यात अडकवत होता आणि लग्न करण्यासाठी तयार करत होता. महिलाही त्याच्या बोलण्यात अडकत होत्या. व्यक्तीने प्लान केला होता की, तो अनेक महिलांसोबत लग्न करेल आणि काही दिवसांनी रोख रक्कम व दागिने घेऊन फरार होईल. पण वेळीच त्यांचा भांडाफोड झाला. आरोपीला विशाखापट्टनम येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.