लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांना फोनवर शिवीगाळ करत धमकावल्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने माहीम कॉजवे येथे राहणाऱ्या ओसामा समशेद खान (४८) याला शनिवारी ताब्यात घेतले. जमिनीच्या वादातून आलेल्या निराशेत त्याने हे केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी तक्रार दिली होती.
गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता. शेलार यांना धमकावल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि समांतरपणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने तांत्रिक तपास सुरू केला. यात त्यांना कॉलरची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे खान याला ताब्यात घेतले. खान याला पुढील चौकशीसाठी वांद्रे पोलिसांकडे सुपुर्द केले जाणार आहे, असे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले.
भ्रष्टाचार उघड केल्यानेच धमकी भाजप आमदार आशिष शेलार सातत्याने राज्य सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार उघडकीस आणत आहेत. सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असल्यामुळेच त्यांना धमकी आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यानिमित्ताने केली आहे.