बल्लारपूर : युवतीचा अर्धनग्न व्हिडिओ फेसबुकवर फेक अकाउंट बनवून व्हायरल करणाऱ्या मजनूला बल्लारपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संमुखसिंग हनुमानसिंग बुंदेल (२५) रा. शिवाजी वार्ड असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी शनिवारला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपी संमुखसिंगची मुलीसोबत दोन वर्षांपासून ओळखी होती. तो नेहमी तिला तुझी बदनामी करतो म्हणून चिडवायचा व जातीवाचक शिवीगाळ करायचा. परंतु मुलीने या गोष्टी घरच्यांना सांगितल्या नाही. २७ मे रोजी तो तिला महाकाली मंदिरात घेऊन गेला व तिथून येताना जंगलात घेऊन गेला व मारहाण केली. या घटनेनंतर परत त्याने मुलीला १ जूनला जुनोना जंगलात नेऊन तिचे वस्त्र फाडले व अर्धनग्न स्थितीत व्हिडीओ काढला. त्यानंतर ४ जूनला आशिष मल्होत्रा नावाचा फेक फेसबुक अकाउंट तयार करून तिचा व्हिडीओ व्हायरल केला. जो १३४ लोकांनी बघितला. त्या मुलीनेही बघितल्यामुळे तिने तेव्हाच बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी व्हिडीओ बघून पंचनामा केला व फेक फेसबुक अकाउंट बंद केला.आरोपीविरुध्द भादंवि ३७६,५०६,३५४,अ.जा.ज.कलम ३,आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम या व्यतिरिक्त ६६ अ आयटी ॲक्ट या कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.