लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शाळेतील अभ्यासाच्या चढाओढीतून उच्च शिक्षण घेत एक जण अमेरिकेत, तर दुसरा लंडनमध्ये स्थायिक झाला. मात्र, शाळेतल्या स्पर्धेचा राग कायम राहिला. त्यातूनच, अमेरिकेत स्थायिक झालेल्या तरुणाने थेट ‘मित्र अतिरेकी आहे’ असे सांगणारा कॉल पुणे पोलिस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली.
सोमवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी पुणे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात अमेरिकेतून अर्थ पांचाळ नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्याने एपिक कॅपिटल येथे काम करणारा हर्ष झवेरी अतिरेकी असल्याचे सांगून कॉल कट केला. पुणे पोलिसांनी लगेचच ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीशी अमेरिकेच्या मोबाइलवर संपर्क साधला. पण त्याने माहिती न देता, कॉल कट केला. एपिक कॅपिटलचे ऑफिस वरळी येथे आहे. स्थानिक पोलिसांनी चौकशी करताच, हर्ष झवेरी त्या कंपनीत उपाध्यक्ष होते. मात्र ते दीड वर्षापूर्वी लंडनला शिफ्ट झाल्याचे समजले.
पुढे आलेल्या माहितीत पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. पांचाळ आणि झवेरी दोघेही सुरतचे रहिवासी आहेत. एकाच शाळेत शिकले. शाळेत पहिला कोण येणार यावरून दोघांमध्ये चढाओढ असायची. त्यामुळे त्याला त्रास देण्यासाठी त्याने खोटा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहे.