पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या गुप्तांगाचे तुकडे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. युक्रेनच्या खारकिव प्रांतात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा एका हॉटेलच्या बाहेर ही घटना घडली. शेवचेन्कोवो गावातील २७ वर्षांचा दिमित्री स्पास्किन त्याच्या पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये मित्रांना भेटायला गेला होता. स्पास्किनची पत्नी रात्री १ च्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडली. यानंतर दहा मिनिटांत स्पास्किनदेखील तिथून निघाला. यावेळी रस्त्यात दिमित्री इनचेन्को नावाच्या एका २५ वर्षीय तरुणानं त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. इनचेन्कोनं आधी स्पास्किनच्या पत्नीची छेड काढली. मात्र तिनं त्याकडे दुर्लक्ष करताच त्यानं तिचा चेहरा झाकला आणि झुडूपात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार मागून येत असलेल्या स्पास्किननं पाहिला. 'त्यानं माझ्या पत्नीचा गळा धरला होता. तो तिला घेऊन झुडूपात गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न करत होता,' अशी माहिती स्पास्किननं पोलिसांना दिली. हा प्रकार पाहताच स्पास्किन इनचेन्कोच्या दिशेनं धावला. त्यानं त्याच्याकडे असणाऱ्या स्विस चाकूनं इनचेन्कोच्या गुप्तांगावर वार करत त्याचे तुकडे केले. गुप्तांगावर वार झाल्यानंतर इनचेन्को किंचाळला. त्याच्या आवाजामुळे परिसरात राहणारे नागरिक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन केला. दरम्यान जखमी झालेल्या इनचेन्कोनं रुग्णालय गाठलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिमित्री स्पास्किनला अटक केली आहे. त्यानं त्याच्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे.
पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न; पतीनं केले त्याच्या गुप्तांगाचे तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 4:58 PM