नवी दिल्ली-
एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत हनीमूनसाठी थायलंडला गेला होता. तेथील समुद्राची मजा घेण्यासाठी तो पाण्यात उतरला आणि एका भयानक दुर्घटनेचा शिकार बनला आहे. यात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. ३४ वर्षीय व्यक्तीनं थायलंडमधील एका समुद्रात 'वॉर्निंग लाइन'ही ओलांडली आणि पोहू लागला. समुद्राच्या पाण्याशी केलेलं नसतं धाडस या व्यक्तीच्या अंगाशी आलं तो पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वाहून गेला. संबंधित व्यक्तीचं नाव अली मोहम्मद मियाँ असल्याची माहिती समोर आली आहे.
अली ब्रिटनचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. १२ जुलै रोजी तो हनीमून ट्रिपसाठी थायलंडच्या फुकेत आयलंडवर गेला होता. अली आपल्या पत्नीसह फुकेतमधील एका फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये थांबला होता. याच ट्रिपमध्ये अली आपल्या पत्नीसह समुद्रात पोहण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत ५५ वर्षीय एक स्थानिक रहिवासी देखील होता. स्विमिंग करता करता अलीनं इशारा रेषा देखील ओलांडली आणि समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेला. समुद्र रक्षकांनी तातडीनं अली यांचा शोध सुरू केला आणि बाहेर काढलं. अलीला तातडीनं रुग्णालयातही हलविण्यात आलं. पण तोवर खूप उशीर झाला होता. अली आणि त्याच्यासोबत असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीचा देखील यात मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?संबंधित घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी ब्रिटीश दूतावासात दिली आहे. अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार त्यांना संध्याकाळी ५ वाजता फोन आला होता. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी समुद्रात बुडणाऱ्या दोन व्यक्तींना बाहेर काढलं. त्यांना रुग्णालयात पोहोचवलं. पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं आहे.