उत्तराखंडमधील मसुरी येथे एका किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाने लग्न करण्यासाठी असं कृत्य केलं आहे की जे समल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी, त्याने सर्वप्रथम राजस्थान पोलिसात हवालदार आणि नंतर अलवरमध्ये इन्कम टॅक्स विभागात अधिकारी म्हणून ओळख करून दिली.
अधिकारी असल्याचं सांगूनही काहीच घडलं नाही त्यामुळे त्याने काही काळानंतर दावा केला की, आयपीएस अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे. जयपूरच्या प्रागपुरा भागात राहणारा सुनील कुमार मसुरीच्या एका किराणा दुकानात काम करायचा. मोकळ्या वेळेत तो मसुरी आयपीएस ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर जाऊन फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर पोस्ट करायचा.
फोटोंवरून मुलीच्या कुटुंबीयांचा विश्वास बसला की, सुनील हा आयपीएस अधिकारी आहे आणि त्या आधारे मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिला आणि काही वेळाने जेव्हा त्यांना खरं काय ते समजलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सुनीलने मुलीचा भाऊ आणि मित्रांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचं ठरवलं. त्यावेळीच त्याची मोठी पोलखोल झाली.
मुलीच्या भावाला सुनीलचं सत्य तेव्हा कळलं जेव्हा त्याला मसुरीच्या स्थानिक लोकांकडून माहिती मिळाली, सुनील प्रत्यक्षात सरकारी अधिकारी नसून एका किराणा दुकानात काम करतो. हे सत्य समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लगेचच लग्न मोडलं आणि पोलिसात तक्रार दाखल केली.
मुलीचे वडील बद्री प्रसाद चौहान यांनी दिलेल्या माहितीमुसार, साखरपुडा तोडल्यानंतर त्यांनी मुलाला साखरपुड्यादरम्यान दिलेल्या वस्तू परत करण्यास सांगितलं. तेव्हा सुनीलने ते परत करण्यास नकार दिला. या फसवणुकीनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सुनील कुमारविरुद्ध प्रागपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक तपास करत आहेत.