मुरादाबाद: तीन खासगी रुग्णालयांनी मृत ठरवलेली, त्यानंतर सात तास शवागारात ठेवण्यात आलेली व्यक्ती जिवंत असल्याचं पोलिसांच्या पंचनाम्यादरम्यान लक्षात आलं. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू करण्यात आले. खासगी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयानं केलेल्या प्रचंड हलगर्जीपणामुळे या व्यक्तीला जीव गमवावा लागला. श्रीकेश असं या व्यक्तीचं नाव आहे. १८ नोव्हेंबरला त्यांचा अपघात झाला होता.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या श्रीकेश यांचा १८ नोव्हेबरला अपघात झाला. दूध खरेदी करण्यासाठी निघालेले श्रीकेश अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तीन खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अखेर श्रीकेश यांच्या कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेलं. इमर्जन्सी वॉर्डमध्ये असलेल्या डॉ. मनोज यांनी श्रीकेश यांना तपासलं आणि मृत घोषित केलं. त्यानंतर श्रीकेश यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबरला सकाळी पोलीस पंचनाम्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी श्रीकेश यांचा श्वास सुरू असल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर शवागारात खळबळ माजली. कुटुंबियांनी याची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी श्रीकेश यांना तपासलं. ते जिवंत असल्याचं लक्षात येताच त्यांच्यावर उपचार सुरू केले. श्रीकेश यांची अवस्था गंभीर असल्यानं त्यांना मेरठला रेफर करण्यात आलं.
मेरठमध्ये ४ दिवस श्रीकेश यांच्यावर उपचार झाले. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. श्रीकेश कुमार स्थानिक नगर परिषदेत काम करायचे. श्रीकेश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयावर गंभीर आरोप केले. 'त्यावेळी मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात इमर्जन्सी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी श्रीकेश यांना मृत घोषित केलं. त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच श्रीकेश यांचा जीव गेला,' असा आरोप श्रीकेश यांचे नातेवाईक किशोरी लाल यांनी केला.