सहारनपूर – कोतवाली येथील देवबंद येथे घरगुती वादातून एका युवकाने विष पाजून पत्नीची हत्या केली त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीड वर्षापूर्वी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. इतकचं नाही तर ११ दिवसांपूर्वी जोडप्यानं मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं मात्र पत्नीच्या वागणुकीमुळं पती त्रस्त असल्याने त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं.
दलीपने सुरुवातीला पत्नी प्रतिभा हिला विष देऊन ठार केले त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली. धर्मपूर सरावगी येथे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या दलीपनं घटनास्थळी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्येचं पाऊल का उचललं? याचा खुलासा केला. सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, जीवनात खूप त्रस्त झालो आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा सर्व खूप आनंदात होते. परंतु मी नाही. जिच्याशी लग्न करतोय ती माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल असं वाटलं नव्हतं. प्रतिभाने पवित्र नात्यावर खूप लाजिरवाणे आरोप केले. सासूसासरेही याच प्रकारे आरोप करत होते. एक-एक दिवस कसा जातोय हे मित्रानांही माहिती नव्हतं. प्रतिभामुळे खूप त्रास झाला त्यामुळे प्रतिभाला संपवत आहे आणि स्वत:ला संपवून टाकतोय असं त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं.
यापुढे सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, आई मामाकडे गेली आहे. मी संपूर्ण शुद्धीत प्रतिभा आणि स्वत:ला संपवून घेत आहे. माझ्या मुलाचं नाव यश आहे. हा मुलगा माझ्या आईला देण्यात यावा. माझी आई आणि दोन बहिणी येईपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये. ज्या पवित्र नात्याचा उल्लेख दलीपकडून सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्याचा स्पष्टपणे खुलासा त्याने सुसाईड नोटमध्ये केला नाही. आत्महत्येपूर्वी दलीपने व्हॉट्सअप स्टेटसवरही सुसाईड नोट लावलं होतं. सुसाईड नोटखाली त्याने मोबाईलचा पासवर्ड लिहिला होता.
सीओ रजनीश कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, सुरुवातीला पोलिसांना सूचना मिळाली की महिलेने विष प्यायलं आहे आणि तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता सुसाईड नोट आढळली. ज्यात पत्नीला मारून गळफास घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दलीप उत्तराखंडच्या एका कंपनीत सुरक्षा गार्डमध्ये नोकरी करत होता. कुटुंबात मुलाचा जन्म होताच तो सुट्टी घेऊन घरी परतला होता.
कशी घडली घटना?
२६ वर्षीय दलीप कुमारनं २२ वर्षीय प्रतिभाला आधी विष दिलं. त्यानंतर खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. खोलीत लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर गावकऱ्यांनी खोलीत वाकून पाहिलं असता दलीपनं गळफास घेतल्याचं दिसून आलं तर बेडवर प्रतिभाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी येताच दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवण्यात आलं. पोलीस निरीक्षक योगेश शर्मा यांनी सांगितले की, प्रतिभाच्या मृत्यूचं कारण पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर कळेल असं सांगितले.