Mumbai Airport, Tea Powder: महाराष्ट्रात चहा पावडरच्या पाऊचमध्ये कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्यांची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कस्टम विभागाने आरोपीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. मुकीम रजा अश्रफ मन्सुरी असे आरोपीचे नाव असून तो मुंबईहून दुबईला जात होता. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चहा पावडरच्या बॉक्समध्ये तब्बल दीड कोटींचे हिरे असल्याची माहिती मिळाली असून हा ऐवज जप्त केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील नळ बाजार परिसरात राहणारा मुकीम रझा अश्रफ मन्सूरी (३०) हा मुंबईहून दुबईला जात होता. दरम्यान, कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मन्सूरीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखले. तपासादरम्यान, मन्सूरीच्या बॅगमधून प्रसिद्ध चहा ब्रँडची पिशवी जप्त करण्यात आली. या पाऊचची तपासणी केली असता यातील आठ पाऊचमध्ये ३४ हिरे आढळून आले. ज्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. हिरे तस्करीसाठी पाच हजार रुपये मिळणार असल्याचे वचन दिल्याचे आरोपीने सांगितले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.