प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात ना..परंतु केरळमध्ये अशी एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. प्रेमात पडलेले लोक स्वत:च्या प्रेमाला मिळवण्यासाठी विविध मार्ग वापरतात पण केरळमध्ये एका प्रेमीयुगलाने प्रेमासाठी जे केले ते मुर्खपणापेक्षा कमी नाही. याठिकाणी एका प्रियकरानं कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल १० वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं.आश्चर्य म्हणजे त्याच्या घरातील सदस्यांनाही त्यांच्या घरात १० वर्षापासून एक अज्ञात युवती राहतेय त्याची कल्पना नव्हती. या अजब प्रेमाची सुरूवात फेब्रुवारी २०१० मध्ये झाली तेव्हा १८ वर्षीय सजिथा नावाची एक मुलगी अचानक घरातून गायब झाली.
सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही. ना ती नातेवाईकांच्या घरी गेली ना स्वत:च्या घरी आली. घरातून बाहेर गेलेली सजिथा बेपत्ता झाली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा सजिथा घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु सजिथा ठावठिकाणा लावण्यास त्यांनाही अपयश आलं.
हताश झालेल्या मुलीच्या घरच्यांनी सजिथा आता या जगात नसावी असं मानलं. परंतु मुलीचे घरचे आणि गावातले तेव्हा हैराण झाले ज्यावेळी मागील आठवड्यात सजिथा मेलेली नसून ती जिवंत आहे हे समजलं. मागील १० वर्षापासून सजिथा तिच्या घरापासून बाजूला असलेल्या घरात राहत होती. सजिथाही ही कहाणी समझण्यापूर्वी तुम्हाला तिच्या प्रियकराबाबत जाणून घ्यायला हवं. सजिथा तिच्याच गावातील २४ वर्षीय मुलावर प्रेम करत होती. रहमान आणि सजिथा एकाच गावात राहत होते. त्यांच्या या प्रेमाची कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना काहीच माहिती नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत दोघांनीही हा प्लॅन बनवला. १० वर्ष कोणालाही भनक न लागता ते दोघंही एकाच छताखाली राहत होते.
रहमान एक इलेस्ट्रिशियन होता. त्यामुळे हुशारीने त्याने असे लॉक बनवले की त्याच्याशिवाय दुसरं कोणीही ते लॉक खोलू शकत नव्हता. तसेच त्याच्या रुमबाहेर काही विजेच्या ताराही लटकत होत्या. ज्याच्या जवळ गेल्याने अनेकदा त्याच्या घरच्यांनाही विजेचा शॉक बसला होता. रहमान त्याच्या घरच्यांसमोर वेडेपणाचं नाटक करायचा. तो मानसिक आजारी आहे असं रहमानच्या घरच्यांना वाटत होते. अचानक रहमानच्या राहण्यापिण्यात बदल झाला. तो पहिल्याहून जास्त जेवण करू लागला. तो त्याच्या घरच्यांसोबत जेवत नव्हता तर रुममध्ये जाऊन जेवायचा. १० वर्ष सजिथा रहमान एका छोट्या खोलीत राहत होते. फक्त रात्रीच्या वेळी सजिथा शौचालयासाठी बाहेर निघत होती.
या दोघांना ‘असं’ पकडलं
दिनक्रम सुरू असताना अचानक तीन महिन्यांपूर्वी रहमान घर सोडून निघून गेला. ३ महिने त्याच्या घरातले त्याचा शोध घेत होते. परंतु एकेदिवशी रहमानला त्याच्या भावाने बाईकवरून जाताना पाहिलं. त्याने रहमानला आवाज दिला परंतु त्याने गाडी थांबवली नाही तो पळू लागला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं रहमानला पकडण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने जवळच एका मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत असल्याचं भावाला सांगितले. त्यानंतर प्रेमीयुगलाला कोर्टात हजर केले असता मजबुरीमुळे आम्हाला हे सर्व करावं लागलं. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्हाला एकत्र राहायचं होतं. परंतु घरातले आमच्या नात्याला परवानगी देणार नाहीत अशी भीती मनात होती. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचं दोघांनी कोर्टात सांगितले.