तिरुपूर : तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील बनवल्याने नाराज झालेल्या पतीने पत्नीची शॉलने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री एका 38 वर्षीय व्यक्तीने पत्नीला शॉलने गळा आवळून ठार केले. या घटनेनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी सोशल मीडियाची रील बनवण्यात बराच वेळ घालवायची. पत्नीच्या या सवयीने पती खूप नाराज झाला होता.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डिंडुगल येथील अमृतलिंगम याचे चित्रासोबत लग्न झाले होते. तो तिरुपूरमधील सालेम नगरमध्ये राहत होता. अमृतलिंगम हा तेन्नम पलायम भाजी मंडईत रोजंदारी मजूर म्हणून काम करत होता, तर चित्रा एका कपड्याच्या कारखान्यात काम करत असताना तिला टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर रील पोस्ट करण्याची सवय लागली होती. रील पोस्ट करण्याच्या सवयीवरून अमृतलिंगमचे चित्रासोबत अनेकदा भांडण झाले होते. चित्रा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असल्याची तक्रार अमृतलिंगम यांनी केली होती.
रील पोस्ट केल्यामुळे चित्राला सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स मिळाले. यानंतर चित्राने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती दोन महिन्यांपूर्वी चेन्नईला गेली होती. इंस्टाग्राम अकाउंटवर चित्राचे 33.3K फॉलोअर्स होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात ती आपल्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी घरी आली होती. लग्न झाल्यानंतर चित्रा पुन्हा चेन्नईला जाण्याच्या तयारीत होती, पण अमृतलिंगमला तिने घर सोडून अभिनयात जावे, असे वाटत नव्हते.
चित्राची रील अपलोड करण्याची सवय आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची तिची इच्छा, यावरून रविवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की, अमृतलिंगमने शॉल वापरून चित्राचा गळा दाबला. ती बेशुद्ध पडल्यावर अमृतलिंगम घाबरला आणि घरातून निघून गेला. त्यानंतर त्याने चित्राला ठार केल्याचे आपल्या मुलीला सांगितले.