बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूत एका ३५ वर्षीय इराणी नागरिकाला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. बिदादी परिसरात असलेल्या एका व्हिलामधून पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या. जवाद रोस्तमपूर असं तरुणाचं नाव असून २०१० मध्ये तो शिक्षणासाठी बंगळुरूत आला होता. एमबीए पूर्ण केलेल्या जवादनं घरात केलेला कारनामा पाहून पोलिसांना धक्का बसला.
बिदादीजवळ असलेल्या कम्मनहलीमध्ये एका व्हिलामध्ये राहणाऱ्या जवादनं हाइड्रोपोनिक मॉडेलचा वापर करत भांगेची शेती केली. भगवान शंकराचा प्रभाव आपल्यावर असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. गेल्या ३ वर्षांपासून तो अंमली पदार्थांचं सेवन करत आहे. याशिवाय मित्रांना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं कामदेखील करतो.
जवादनं भांगेबद्दल सहा महिन्यांहून अधिक काळ संशोधन केलं. उत्पादन कसं घ्यायचं, ते घेताना काय काळजी घ्यायचे याची माहिती त्यानं ऑनलाईन गोळा केली. लॉकडाऊनच्या काळात त्यानं भांग आणि पुदिना उगवण्याचा निर्णय घेतला. भांगेचं उत्पादन घेण्यासाठी त्यानं हाइड्रोपोनिक मॉडेल तयार केलं. त्यानं युरोपच्या डार्क वेबच्या माध्यमातून ६० बियाणं मागवली. पहिलं बियाणं त्यानं फिश टँकमध्ये लावलं.
जवादनं घरच्या घरी गांजाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यानं रोपट्यांची उत्तम काळजी घेतल्याचं क्राईम ब्रांचचे अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितलं. यामध्ये जवादला त्याच्या मित्रांनी मदत केली. त्यांनी एकूण १३० रोपटी उगवली. एक ग्रॅम गांजाची किंमत ३ ते ४ हजार होती. एलईडी लाईट्स आणि रसायनांच्या मदतीनं जवादनं गांजाची शेती केली.