वर्धा : घरून बेपत्ता असलेल्या अविनाश राजू फुलझेले याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेगाव (स्टेशन) शिवारात एका शेतात आढळला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विवाहितेची छेड काढल्यानेच आम्ही अविनाशला जिवानीशी ठार केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट येथील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी अविनाश राजू फुलझेले हा २७ ऑक्टोबरला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. अशातच २८ रोजी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोनेगाव (स्टे.) शिवारात आढळून आला. या प्रकरणी सुरूवातीला अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२ व २०१ अन्वये गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात करण्यात आली. याच दरम्यान पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. अशातच अविनाश सोबत आणखी दोन व्यक्तींना बघितल्या गेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निखील प्रभाकर ढोबळे (२८) व सुधीर उर्फे चेतन दिलीप जवादे (३५) यांना टाकळी आणि हिंगणघाट येथून ताब्यात घेतले.
पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता या दोन्ही संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एम. एच. ३२ ए.ए. ०२०५ क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा संतोष दरगुडे, गजानन लामसे, शेख हमीद, रंजीत काकडे, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, राजेश जैसिंगपुरे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, पवन पन्नासे, गोपाल बावणकर, मनिष कांबळे, नवनाथ मुंडे, अमोल ढोबळे, प्रदीप वाघ यांनी केली.मद्यधुंद अवस्थेत नेले घटनास्थळीया प्रकरणातील आरोपी निखील ढोबळे व सुधीर उर्फे चेतन जवादे या दोघांनी पूर्वीपासून ओळख असलेल्या अविनाश फुलझेले याला मद्यधुंद अवस्थेत सोनेगाव (स्टेशन) शिवारात नेले. तेथे या दोन्ही आरोपींनी अविनाशवर दगडाने जबर प्रहार करून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे.
एसपींचा सल्ला ठरला महत्त्वाचाया प्रकरणातील मृतकाचा चेहरा आरोपींनी दगडाने ठेचून विद्रूप केला होता. त्यामुळे सुरूवातीला मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पण मृतकाची ओळख पटल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समांतर तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अवघ्या काही तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना जेरबंद केल्याने पोलीस अधीक्षकांचा सल्ला महत्त्वाचा राहिला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.