नागपूर- बालाघाटला गेलेल्या एका व्यक्तीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजयसिंग रवींद्रसिंग गौर (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव असून, दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर त्यांची त्यांच्याच मित्राने हत्या केली असावी, असा संशय आहे.
स्मृतिनगर म्हाडा कॉलनीत राहणारे संजयसिंग ऑईल पेंट बनविणाऱ्या एका कंपनीत मार्केटिंगचे काम करीत होते. ते अविवाहित होते. त्यांच्या परिवारात भाऊ प्रफुल्लसिंग गाैर आणि एक विवाहित बहीण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्या बालाघाटमधील नातेवाईकाकडे वास्तूपूजनाचा कार्यक्रम असल्याने संजय तिकडे गेले होते. रात्री ते नागपुरात उतरल्यानंतर त्यांनी संतोष गडेकर नामक मित्राला फोन करून घ्यायला बोलविले. दरम्यान, मध्यरात्र झाली तरी संजय घरी परतले नसल्याने घरच्यांनी बालाघाटमधील मामांना फोन केला असता, ते तेथून रात्री ७ वाजताच नागपूरकडे निघाल्याचे मामांनी सांगितले. संजयला दारूचे व्यसन असल्याने कुठे मित्रासोबत बसले असावेत, असे समजून भाऊ गप्प बसला.
गुरुवारी सकाळी एका कारच्या गोदामाजवळ संजयसिंग यांचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. मृताची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात दोन संशयित आरोपी संजयला मारहाण करून एका आडोशाला ओढत नेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी प्रफुल्लसिंगच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी कळमन्यात सापडले -ठाणेदार बेसरकर आणि सहकाऱ्यांनी संजयच्या मोबाईलचा सीडीआर काढून त्याने ज्याला शेवटचा फोन केला होता, त्याचा शोध सुरू केला. तो वाडीतील रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे कळाल्याने, पोलिसांची वेगवेगळी पथके संशयित संतोषचा शोध घेऊ लागली. रात्री ७ च्या सुमारास संतोष आणि त्याचा एक साथीदार कळमना परिसरात पोलिसांच्या हाती लागले. ते दारूच्या नशेत टुन्न होते. त्यामुळे त्यांच्याकडून फारशी माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र, ताब्यात घेतलेला संतोष आणि साथीदार तसेच सीसीटीव्हीत संजयला मारहाण करीत नेताना दिसणारे आरोपी एकच असल्याने, त्यांनीच संजयची हत्या केल्याचा दाट संशय आहे.