नोएडा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असताना उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्रेटर नोएडात लुडो खेळताना एका व्यक्तीवर त्याच्याच मित्रांनी गोळी झाडली आहे. लुडो खेळताना खोकला आल्यानं त्याच्या शेजारी बसलेल्या मित्रानं त्याच्यावर गोळी झाडली. दयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जारचामधील सैंथली मंदिर परिसरात चार मित्र (जय, वीर उर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत) लुडो खेळत होते. यावेळी प्रशांतला खोकला आला. त्यावर गुल्लू आणि इतर मित्रांचा प्रशांतसोबत वाद झाला. प्रशांत खोकून कोरोना पसरवत असल्याचं इतरांनी म्हटलं. यानंतर संतापलेल्या गुल्लूनं त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून प्रशांतवर गोळी झाडली. गुल्लूनं झाडलेली गोळी प्रशांतच्या मांडीला लागली. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं नोएडातल्या कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांना सांगितलं. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्याासाठी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे अकरा हजारांपेक्षा जास्त असून ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९ हजार ७६८ जणांवर उपचार सुरू असून १ हजार ३६६ जण बरे झाले आहेत.
CoronaVirus: लुडो खेळताना खोकला; कोरोना पसरवतोय म्हणत मित्रानं गोळी झाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 1:14 PM