उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हापूर येथील एका व्यक्तीने डेहराडूनची जमीन हडप करण्यासाठी पोलिसांसोबत फिल्मी कट रचला. व्यक्तीने बिजनौर येथून शूटर हायर केला. स्वत:वरच गोळी झाडली आणि पोलिसांना खोटी माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन दिवसांनंतर व्यक्तीने तयार केलेल्या संपूर्ण फिल्मी स्टोरीचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यात गोळी लागून जखमी झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे. तसेच हापूरच्या टीपी नगरचे चौकी प्रभारी आणि या फिल्मी स्टोरीत सहभागी असलेल्या एका हवालदाराला निलंबित करण्यात आले. हापूरचे एएसपी विनीत भटनागर यांनी सांगितलं की, ९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग ९ वर एका व्यक्तीवर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
आसाममधील दिब्रुगड येथील रहिवासी दीपचंद अग्रवाल हे या घटनेत गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. दीपचंद अग्रवाल यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती दिली. डेहराडूनमधील रहिवासी कुमुद वैद्य आणि त्यांचा मुलगा सत्यम वैद्य यांनी डेहराडूनमधील जमिनीच्या वादातून हा प्राणघातक हल्ला केल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हापूर एएसपी म्हणाले की, पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, दीपचंद अग्रवाल यांनी बिजनौर येथील एका शूटरला त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी हायर केलं होतं. टिपी नगर चौकीच्या प्रभारीचाही या कटात समावेश केला होता. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला. एसपी ज्ञानंजय सिंह यांच्या आदेशानुसार प्रभारी आणि एका हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दीपचंद्र अग्रवालसह शूटर आसिफ आणि अन्य एकाला अटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.