हुंडा घेणं आणि देणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तरीही आपल्याकडे आजही अनेक ठिकाणी हुंडा प्रथा दिसून येते. अशीच एक धक्कादायक घटना फिरोझाबाद येथे घडली. मोहम्मद रझ्झाक या व्यक्तीला आपल्या बहिणीच्या नवऱ्याला हुंड्यात बाईक देता आली नाही. यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक ठिकाणी कमी खर्चात लग्न केली जात आहे. तर दुसरीकडे मोहम्मद रझ्झाक सारख्या व्यक्तीला आपल्या बहिण्याच्या लग्नाची किंमत आपला जीवावर उदार होऊन चुकवावी लागली. मोहम्मद रझ्झाक यानं आपली बहिण रेश्मा हिचं लग्न गुड्डू नावाच्या एका व्यक्तीशी धार्मिक पद्धतीनं लावून दिलं. परंतु लग्नानंतर गुड्डू हा आपली पत्नी रेश्मा हिला हुंड्यात बाईक देण्यासाठी त्रास देत होता. मोहम्मद रझ्झाक हा आपल्या घरी असताना त्याच वेळी त्याच्या बहिणीचा नवरा गुड्डू हा त्याच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्यांच्यामध्ये मोठी बाचाबाचीही झाली. त्याच क्षणी गुड्डूनं आपल्याकडे असलेली बंदूक काढत मोहम्मद रझ्झाक याला गोळी घातली. दरम्यान, या घटनेनंतर त्याला सरकारी ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आलं. परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्याला आग्रा येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर रझ्झाकच्या कुटुंबीयांनी गुड्डूला पोलिसांच्या ताब्यात दिलं. गुड्डूला अटक करण्यात आली असून त्याच्याडून बंदूक आणि दोन जीवंत काडतुसं ताब्यात घेण्यात आली आहेत. तसंच रझ्झाकलाही उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी मुकेश चंद्र मिश्र यांनी दिली.
हुंड्यात हवी होती बाईक, मिळाली नाही म्हणून थेट मेव्हण्यालाच घातली गोळी
By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 1:37 PM
लग्नानंतर पती करत होता पत्नीकडे हुंड्यात बाईक देण्याची मागणी
ठळक मुद्देपोलिसांकडून आरोपीला अटकजखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार, पोलिसांची माहिती