दिल्ली पोलिसांसमोर फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने पंचतारांकित हॉटेल द लीला पॅलेसच्या कर्मचाऱ्यांची तब्बल 23 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्याने स्वतःला UAE चा रहिवासी आणि अबू धाबीच्या राजघराण्यातील कर्मचारी असल्याचे सांगितले आणि तो जवळपास 4 महिने राहिला. मग अचानक हॉटेलवाल्यांना चकमा देऊन तो पसार झाला.
हॉटेलचे 23 लाख रुपयांचे बिल थकीत होते. पोलिसांनी आरोपीची ओळख मोहम्मद शरीफ अशी केली आहे. आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्रे व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी साउथ वेस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफ हा फरार आहे. त्याला शोधासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.
हॉटेल व्यावसायिकांनी पोलिसांना सांगितले की, शरीफ गेल्या वर्षी 1 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हॉटेल लीला पॅलेसमध्ये थांबला होता. त्यानंतर अचानक तेथून कोणालाही न सांगता निघून गेला. तसेच हॉटेलच्या खोलीतून चांदीची भांडी व इतर वस्तू चोरल्या. त्याच्यावर हॉटेलचे 23 लाख रुपये थकीत आहेत. हॉटेल व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी हॉटेल अधिकाऱ्यांना सांगितले की, ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात. अबू धाबीच्या राजघराण्याचे सदस्य शेख फलाह बिन जायद अल नाहयान यांच्या कार्यालयात काम करतात.
आरोपी हॉटेलच्या रुम क्रमांक 427 मध्ये 4 महिने राहिला आणि 20 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेलमधून मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला. त्याचे बिल सुमारे 35 लाख झाल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याने हॉटेलवाल्यांना साडेअकरा लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम त्याने भरली नाही. हॉटेल व्यावसायिकांना बनावट बिझनेस कार्ड, यूएई रहिवासी कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यांची आता चौकशी सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"