काही लोक कुंभमेळ्याला पाप धुण्यासाठी येत आहेत, पण एका व्यक्तीने प्रयागराजला येऊन पवित्र संगमात स्नान केल्यानंतर 'महापाप' केल्याचं समोर आलं आहे. दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आणि हे सर्व संगम शहरात यात्रेकरूंसाठी बांधलेल्या गेस्ट हाऊसमध्ये केलं आहे. प्रयागराजमध्ये पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दिल्लीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पत्नीला महाकुंभाला घेऊन जाऊन त्याने हत्या केली आहे.
आरोपी अशोक कुमारने १८ फेब्रुवारीच्या रात्री झुंसी परिसरातील एका गेस्ट हाऊसच्या बाथरूममध्ये पत्नी मीनाक्षीचा गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. दोघेही दिल्लीतील त्रिलोकपुरी येथून प्रयागराजला आले होते. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रयागराज पोलिसांना माहिती मिळाली की, महाकुंभ यात्रेकरूंसाठी गेस्ट हाऊस म्हणून वापरल्या जाणाऱ्या होमस्टेच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा असं आढळून आलं की, हे जोडपे आदल्या रात्री होमस्टेमध्ये आलं होतं. आयडी व्हेरिफिकेशन न करताच त्यांना खोली देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मॅनेजर घटनास्थळी आला तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचा फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांवर प्रकाशित केला. २१ फेब्रुवारी रोजी महिलेचा फोटो पाहिल्यानंतर, मीनाक्षीचा भाऊ प्रवेश कुमार आणि तिचे दोन्ही मुलं प्रयागराजला पोहोचले. पोलिसांनी अशोकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिस चौकशीदरम्यान, अशोकने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की तो तीन महिन्यांपासून आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचत होता. त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध होते, त्यामुळे त्याने आपल्या पत्नीला मारण्याचा कट रचला.
आपल्या कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी अशोकने त्याचा मुलगा आशिषशी संपर्क साधला आणि मीनाक्षी तीर्थयात्रेच्या गर्दीत बेपत्ता झाली असं खोटं सांगितलं. मीनाक्षीचा मुलगा अश्विन २० फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह महाकुंभात पोहोचला तेव्हा त्याला संशय आला आणि त्याने आपल्या आईचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण करणाऱ्या पोलीस तपासात अशोकच्या जबाबात विसंगती आढळून आली. हत्येच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर अशोकने अपलोड केलेला एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये तो त्याच्या पत्नीसोबत पवित्र स्नान करताना दिसत आहे, त्यामुळे संशयात भर पडली. नंतर पुरावे मिळाल्याने अशोकला अटक करण्यात आली.