नवी दिल्ली – स्पेशल सेलच्या सायबर क्राइम ब्रांचने पालम गावातील एका व्यापाराला मध्यरात्री फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येच्या प्रयत्नात असताना शिताफीनं वाचवलं आहे. पोलिसांकडून काही मिनिटं उशीर झाला असता तर या व्यापाराचा जीव गेला असता. व्यापाराने हाताची नस कापली होती. परंतु पोलीस अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला. पोलिसांच्या प्रसंगावधानाने या व्यक्तीचा जीव वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा स्पेशल सेलच्या सायबर विभागाचे अधिकारी आदित्य गौतम आणि पोलीस निरीक्षक मनोज कुमार सोशल मीडियावर एका फसवणूक प्रकरणातील आरोपींचा तपास करत होते. तेव्हा कोणीतरी व्यक्ती फेसबुक लाईव्ह करून सुसाईड करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांना समजलं. कसंतरी पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर शोधून काढला. मात्र तो मोबाईल स्विच ऑफ असल्याचं आढळलं.
मध्यरात्री त्या व्यक्तीचा कोणताही पत्ता पोलिसांकडे नव्हता. परंतु प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचा तपास लावला. तो पालम गावातील रहिवासी असल्याचं उघड झालं. परंतु जोपर्यंत पोलीस अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी पोहचतील तोपर्यंत खूप उशीर होईल म्हणून अधिकाऱ्यांनी तात्काळ पालम गावातील स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तेथील अधिकारी पारसनाथ यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी पाठवले. तेव्हा जो व्यक्ती आत्महत्या करत आहे त्याचं नाव हिरा असल्याचं पोलिसांना समजलं. तो मिठाई तयार करण्याचं काम करायचा.
हिरा यांनी हाताची एक नस कापली. मागील काही दिवसांपासून हिरा तणावाखाली होते. त्यातून हिरा यांनी टोकाचं पाऊल उचललं. हिराच्या हातातून प्रचंड रक्त वाहत होते. गंभीर अवस्थेत पोलिसांनी हिरा यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी हिराला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसांना त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये शिफ्ट केले. त्याठिकाणी हिरा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार आता हिरा यांच्या जीवाचा धोका टळला आहे. ४० वर्षीय हिराचे दोन लहान मुलं आहेत.