लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: शिरगाव येथील वनविभागाच्या हद्दीतील वनसंपत्तीला आग लावताना शिरगाव येथील ग्रामस्थांनी संजय अमरीत केरकेट्टा (२६) याला पकडले. यावेळी आपले मालक कपिल कोहोल यांच्या सांगण्यावरून आपण हे कृत्य केल्याचा जबाब दिल्याने पालघरवनविभागाने दोन्ही आरोपींविरोधात भारतीय वन अधिनियमच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी संजयला मंगळवारी पालघर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
शिरगाव-सातपाटीच्या पश्चिमेकडील वनविभागाच्या राखीव वन क्रमांक नंबर ११६८ नवीन सर्व्हे नंबर १४४ सातपाटी गावातील वनक्षेत्रालगत आरोपी कपिल कोहोल याचा बंगला आहे. तेथे संजय करकेट्टा नोकरीला आहे. या वनक्षेत्रात वनविभागाच्या सुरूच्या झाडांना आग लागण्याचे प्रकार घडत असतात. या आगीमुळे लगतच्या बागायतदारांच्या बागायतींना धोका निर्माण होत होता. ही आग कोण लावतो, त्याचा शोध स्थानिक तरुण घेत होते. सोमवारी रात्री संजय बंगल्याच्या मागील भागात गुपचूप आग लावत असल्याचे तरुणाच्या निदर्शनास आले. त्याने आपल्या समाजबांधवांना बोलावून या आगीवर नियंत्रण मिळविले आणि आरोपीला पकडले. यावेळी मोठा जमाव जमला होता. वनपाल राजीव पिंपळे यांनी आरोपीला ताब्यात घेतले.