कॅन्सस सिटी : अमेरिकेतील कॅन्सस सिटीमध्ये तिहेरी हत्याकांडप्रकरणी तुरुंगात 43 वर्षे घालवलेल्या एका व्यक्तीसाठी 14.5 लाखांहून अधिक डॉलर म्हणजेच जवळपास 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा करण्यात आली आहे.
दरम्यान, या व्यक्तीला तिहेरी हत्याकांडप्रकरणी चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवण्यात आले. मात्र, अलीकडेच येथील मिसौरी कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्याची शिक्षा रद्द केली. यानंतर त्याच्या मदतीसाठी लोकांनी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू केली. केविन स्ट्रिकलँड असे या व्यक्तीचे नाव आहे.
केविन स्ट्रिकलँडच्या सुटकेसाठी 'मिडवेस्ट इनोसेन्स प्रोजेक्ट'ने मोहीम चालवली आणि मिसौरी कोर्टाकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास त्याला सम्मानपूर्वक जीवन जगण्यास मदत करण्यासाठी देणग्या गोळा करण्यासाठी GoFundMe ची स्थापना केली.
केविन स्ट्रिकलँडला दोषी ठरवण्यासाठी वापरलेले पुरावे नाकारण्यात आले आणि मिसौरी कोर्टाच्या न्यायाधीशांनी गेल्या मंगळवारी त्याच्या सुटकेचे आदेश दिले. यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत केविन स्ट्रिकलँडला मदत करण्यासाठी 14.5 लाख अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त देणग्या जमा झाल्या आहेत.
दरम्यान, या तिहेरी हत्याकांडप्रकरणी केविन स्ट्रिकलँड नेहमी सांगत होता की, तो घरी टीव्ही पाहत होता आणि 1978 च्या हत्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. घटनेच्या वेळी तो 18 वर्षांचा होता. तुरुंगातून सुटल्यावर त्याने देवाचे आभार मानले आहेत.