आग्रा येथील मानव शर्मा आत्महत्या प्रकरणात एक नवं वळण आलं आहे. टीसीएस कंपनीचा रिक्रूटमेंट मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकिता शर्मा आणि तिचे वडील निपेंद्र शर्मा यांना अखेर ३९ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यात दोन्ही फरार आरोपी लपले होते, तेथून आग्रा पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. २४ फेब्रुवारी रोजी डिफेन्स कॉलनीतील रहिवासी मानव शर्मा याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेच्या एक दिवस आधी २३ फेब्रुवारी रोजी, तो मुंबईहून परतला होता आणि त्याची पत्नी निकिता हिला बरहन गावातील तिच्या माहेरी सोडलं होतं. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी त्याने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आत्महत्या केली. मानवची बहीण आकांक्षाने त्याचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. फोनमध्ये सापडलेला व्हिडीओ आत्महत्येचा पुरावा मानला जात होता.
व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी निकिता शर्मा, तिचे वडील निपेंद्र, आई आणि बहिणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर निकिता आणि तिचे वडील २८ फेब्रुवारी रोजी सकाळी फरार झाले. वडिलांनी प्रयागराज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.
पोलिसांनी याच दरम्यान निकिताची आई आणि बहिणीला आधीच अटक केली होती. पोलिसांनी निकिता आणि तिच्या वडिलांना अटक करण्यासाठी प्रत्येकी १०,००० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होती. पोलीस पथकाने अहमदाबादमध्ये छापा टाकला आणि दोघांनाही अटक केली. पोलीस आता निकिताची चौकशी करत आहेत.