आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुंबईतील आयटी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या युवकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. या त्रस्त युवकाने सुसाईडपूर्वी त्याचा लाईव्ह व्हिडिओ बनवला. ६ मिनिटे ४७ सेकंदाच्या या व्हिडिओत त्याने पत्नीवर गंभीर आरोप केले. त्याशिवाय सरकारकडे पुरूषांसाठीही कठोर कायदा बनवण्याचं आवाहन केले. सदरच्या डिफेन्स कॉलनीतील ही घटना आहे. मानव शर्मा एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजरपदावर मुंबईत कार्यरत होता. मयत मानवच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
या घटनेबाबत मानव शर्माच्या बहिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने आरोप केला की, मानव आणि निकिता घटस्फोटासाठी अर्ज देणार होते. निकिताच्या अफेअरची माहिती मानवला मिळाल्यानंतर त्यांचा संसार मोडला. जानेवारी २०२५ मानवला निकिताच्या अफेअरबाबत कळलं. प्रिया नावाच्या महिलेने मानवशी संपर्क केला आणि तिने निकिता व तिच्या २ बहिणी लग्न झालेल्या पुरूषांना कसं फसवतात, त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात याबाबत सांगितले. मानवला तिनेच निकिताच्या अफेअरबद्दल सांगितले होते.
जानेवारीतही आत्महत्येचा प्रयत्न
मानवने जानेवारी २०२५ मध्येही सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता. माझे आई वडील मुंबईला गेले होते, त्यांनी दोघांना समजावले. सहमतीने मानव आणि निकिता घटस्फोट घेण्यास तयार झाले. निकिताच्या अफेअरमुळे त्याने आत्महत्या केली नाही तर त्याला घटस्फोट सहज मिळत नाही याची जाणीव झाली. सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत असं त्याला धमकावले गेले. मानव आणि निकिता २३ फेब्रुवारीला मुंबईतून आग्रा इथं परतले होते. ते दोघे सकाळी वकिलाला भेटणार होते परंतु निकिताने मानवला तिच्या आई वडिलांच्या घरी नेले आणि तिथे त्याला धमकावले. घटस्फोट सहज मिळणार नाही असं त्याला सांगितले.
"माझा भाऊ कुणाला ईजा पोहचवत नाही"
मानव मला मारहाण करायचा हा दावा निकिताने केला, परंतु माझा भाऊ कुणाला ईजा पोहचवत नव्हता. त्याने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. जो स्वत: हा निर्णय घेऊ शकतो, तो दुसऱ्याला कसं मारू शकतो. मानव चांगला पार्टनर होता, तो नेहमी निकिताला मदत करायचा. मानवला आर्ट, पेटिंगमध्ये रस होता. तो गिटारही वाजवायचा. कुठल्याही आईला त्याच्या मुलाचं लग्न करण्यापासून भय वाटू नये. मलाही २ मुले आहेत. कुठल्याही मुलीला मुलाचं आयुष्य बर्बाद करण्याचा हक्क नाही. बंगळुरूच्या अतुल सुहासनंतर आता आग्रा येथील मानव शर्मा याने आत्महत्या केली. लग्नानंतरच्या समस्या, कायदे पुरूषाच्या बाजूने नाहीत असं मानव शर्माच्या बहिणीने सांगितले.
१ वर्षातच संसार मोडला...
माझ्या मुलाचं ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर सून मुलासह मुंबईला गेली. काही दिवसांपर्यंत सर्व काही ठीक होते परंतु नंतर सून सातत्याने घरात वाद घालू लागली. कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागली. सूनेला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचे होते. २३ फेब्रुवारीला सून आणि मुलगा मुंबईहून आग्रा येथे परतले. त्याचदिवशी मानव त्याच्या बायकोला माहेरी सोडण्यास गेला होता. सूनेच्या घरच्यांनी माझ्या मुलाला धमकावलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजता त्याने घरात गळफास घेतला असं मानवचे वडील नरेंद्र शर्मा यांनी सांगितले.