औरंगाबाद : स्वाध्याय केंद्रातुन घरी निघालेल्या उद्योजकाच्या पत्नीच्या गळ्यातील आडीच तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीचोरांनी हिसकावल्याची घटना उल्कानगरीतील खिवंसरा पार्क रोहाऊस समोर गुरुवारी सायंकाळी घडली. तर कर्णपुरा यात्रे आलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
फिर्यादी शकुंतला अशोक सोळंके (रा. खिंवसरा फोर्ट फ्लॅट नं. ईए १९, उल्कानगरी) या स्वाध्याय केंद्रातुन मैत्रिणीसोबत गुरुवारी सायंकाळी घरी पायी चालत जात होत्या. तेव्हा दुचाकीवर आलेल्या आलेल्या अनोळखी दोघांनी त्यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावुन तोडले. या घटनेमुळे घाबरलेल्या शकुंतला यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
या घटनेची माहिती समजताच निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक वसंत शेळके, निवृत्ती गायके हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या प्रकरणी शकुंतला सोळंके यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करीत आहेत.
कर्णपुऱ्यात दोन मंगळसूत्र चोरीलाकर्णपुरा देवीच्या दर्शनाला पहाटे पाच वाजता आलेल्या एका महिलेचे सात ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. तर गुरुवारी रात्री एका महिलेचे एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती छावणीचे निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले. या एका घटनेत गुन्हा नोंदविण्यात आला असून, दुसरा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.