राजकुमार जोंधळे / लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकणाऱ्या एका अट्टल आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून दागिने आणि वाहन असा १९ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. १६ गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र आणि गंठण हिसकावत पळ काढण्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडल्या. याबाबत त्या-त्या पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही शोध घेण्यात आला. दरम्यान, याबाबत गुरुवारी पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात एक आरोपी लातुरात फिरत असल्याची टीप मिळाली. त्याला गूळमार्केट परिसरातून ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने त्यांचे नाव सौदागर उर्फ विशाल मोहन रसाळ (वय ३२, रा. महादेवनगर, खंडापूर, ह.मु. भामरी चौक,लातूर) असे सांगितले.
त्याची कसून चौकशी करत झाडाझडती घेतली असता, त्याने सांगितले गट काही वर्षापासून लातूर शहरातील रियाझ कॉलनी, पद्मा नगर, शारदा नगर, विशाल नगर, भाग्य नगर, अवंती नगर आदींसह विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रस्त्यावरून एकटी आणि पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावून दुचाकीवरुन पसार होत असल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. व्यंकटेश पल्लेवाड, प्रवीण राठोड, सपोउपनि. बेल्लाळे, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, मुन्ना मदने, खुर्रम काझी, रवि गोंदकर , दीनानाथ देवकते, यशपाल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांच्या पथकाने केली.
कार अन दुचाकीसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त...
१६ गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे २८० ग्रॅम वजनाचे १६ मंगळसूत्र, गंठण आणि विविध दागिने पोलिसांनी त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. चोरीतील दागिने विक्री करुन खरेदी केलेली कार, दुचाकी असा एकूण १९ लाख ९४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध ठाण्यात आहेत गुन्हे दाखल...
लातूर शहरातील शिवाजी नगर, एमआयडीसी ठाण्यात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून एकूण १६ गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.