डोंबिवली: कल्याण होमबाबा टेकडी परिसरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत तिचे मंगळसूत्र हिसकावून एकजण पसार झाल्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती. दरम्यान दोन महिन्यांनी या आरोपीला अटक करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आले आहे. अमीर मलंग शेख (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. त्याला बदलापूर येथे सापळा लावून अटक करण्यात आली.
ही घटना ६ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता घडली होती. पिडीतेचा विनयभंग करीत तीच्या गळयातील सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून आरोपीने पलायन केले होते. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला होता. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरिक्षक उमेश गीते यांनी विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी नेमले होते. तब्बल दोन महिने आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तो काही दिवस राजस्थान, अजमेरमध्ये लपून बसला होता. ही माहीती मिळताच टिळकनगर पोलिसांचे तपास पथक अजमेरला रवाना झाले होते. मात्र तेथून तो निसटला. पोलिस त्याच्या मागावर होते. तो शनिवारी बदलापूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने त्याठिकाणी सापळा लावत आरोपी अमीरला बेडया ठोकल्या. अमीर हा हनुमाननगर, होमबाबा टेकडी संतोष नगर परिसरात राहणारा आहे.