आशिष राणे
वसई :- शहरीकरण वाढले आणि गुन्हे ही वाढले अखेर उशिरा का होईना राज्यशासनातर्फे गतवर्षी ०१ ऑक्टोबर २०२० रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांलय स्थापन करण्यात आले. दरम्यान गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाही त्यात महिला व मुलीवरचे अत्याचार ही बाब दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात मुंबई किंवा उपनगरात सध्या महिला वर्ग, लहान मोठया मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
त्यात अलीकडेच मुंबई साकीनाका व कल्याण -डोंबिवली सारख्या घटनानी महाराष्ट्र हादरून गेला मात्र मीरा भाईंदर वसई विरार शहरात देखील भविष्यात घडू नयेत किमान गुन्ह्याला आळा व प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने वसई विरार पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांच्या नेतृत्व व संकल्पनेनुसार झोन २ चे पोलीस उप-आयुक्त संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपूर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी महिला सुरक्षितता म्हणून शहरात माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी १२ तक्रार पेट्या लावल्या आहेत. याव्यतिरिक्त ११२ क्रमांकाचा टोल फ्री नंबर देखील महिलांना मदत म्हणून जाहीर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी लोकमत ला दिली.
दरम्यान खरं तर अनेक महिला, मुली या आपल्या बदनामी ला घाबरत असतात आणि तसे होऊ नये, या भीतीने त्या तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या कधीकधी मानसिक ताण सहन करतात अर्थातच मुली व महिला आपल्या अत्याचाराविरोधात पुढे येत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि यालाच आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली माणिकपूर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे आता महिलांसाठी पोलिसांनी टोल फ्री नंबर ११२ हा जाहीर केला असून शहरात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी एक बंद तक्रार पेटी पोलिसांकडून बसविण्यात आली आहे.
माणिकपूर पोलीस हद्दीत 12 ठिकाणी तक्रार पेटी
पोलिसांनी टोल फ्री नंबर जाहीर केल्याने आता या नंबर वरून कधीही कुठेही केव्हाही महिला, मुलींना आपली तक्रार नोंदवता येणार आहे. मग त्यात शाळा, कॉलेज, रेल्वेस्थानक, बस स्टॉप, वसई पश्चिम सनसिटी चौकी, नायगाव चौक, बँका, रिक्षा स्टॅन्ड आदी अशा 12 ठिकाणी माणिकपूर पोलिसांनी तक्रार पेटी बसविली आहे.
पोलिस ठाण्यात न जाता महिला, मुली आपली तक्रार थेट या तक्रार पेटीत टाकून आपले म्हणणे मांडू शकतात. आणि तक्रार येताच त्यावर एक स्वतंत्र बिट व त्यातील पोलीस यावर तत्काळ कारवाई करणार असल्याचे पोलीसाकडून सांगण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाने नक्कीच महिला व मुली सक्षम व बिनधास्त होण्यास मदत च मिळेल
पोलीस आयुक्त व उपायुक्त सरांचे नेहमीच मार्गदर्शन असते त्यानुसार आता शहरात ११२ टोल फ्री नंबरवर महिला, मुली आपली तक्रार नोंदवू शकतात.आपण 12 सार्वजनिक ठिकाणी तक्रार पेटी लावली आहे. महिलांनी निःसंकोचपणे टोल फ्री नंबरवर फोन करावा, आपली तक्रारपेटीत तक्रार टाकावी, त्यासाठी आम्ही स्वतंत्र बिट तयार केले आहे. तक्रार केल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जाणार आहे.- भाऊसाहेब आहेर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, झोन -२ माणिकपूर पोलिस ठाणे