सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कंत्राटदार माणिकराव पाटील खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. पाटील यांचे अपहरण करुन पैसे मिळवण्याचा कट होता, मात्र ते बेशुद्ध पडल्याने हात बांधलेल्या अवस्थेत त्यांना वारणा नदीत फेकून देण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मूळचे गोटखिंडी (ता. वाळवा) येथील मात्र, सध्या शहरातील राम मंदिर परिसरात माणिकराव पाटील राहण्यास होते. पाटील शासकीय कंत्राटदार म्हणून काम करत होते. शनिवार दि. १३ रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर कवठेपिरानजवळ वारणा नदीत त्यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, संशयित तिघांनाही पैशाची गरज होती. यातील रणदिवे याने लोकांकडून हात उसनवार पैसे उचलले होते ते लोक वारंवार पैसे मागणी करत होते. त्यासाठी पैसे नसल्याने तिघांनी मिळून कोणाला तरी अपहरण करुन त्यांच्याकडून पैसे मागण्याचा कट रचला. त्यानुसार रणदिवे याला माहिती मिळाली की, कंत्राटदार माणिकराव पाटील हे तुंग येथील विश्रांती नाष्टा सेंटर येथे रोज ये-जा करतात. त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संशयितांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चोरलेल्या मोबाईलवरुन पाटील यांच्याशी संपर्क साधत शनिवारी मिणचे मळा, तुंग येथे प्लॉट दाखवायचा आहे म्हणून बोलावून घेतले.
याठिकाणी तिघांनी पाटील यांना पकडताना त्यांच्यात झटापट झाली. याचवेळी रस्त्यावरुन लोक ये-जा करत असल्याने संशयितांनी पाटील यांचे तोंड व हातपाय दाबून धरले. यातच ते बेशुद्ध झाले. यानंतर तिघांनी पाटील यांना त्यांच्याच मोटारीच्या डिकीत घालून ते तुंगमार्गे कवठेपिरानकडे गेले. यावेळी रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी पाहिले असता, पाटील यांची काही हालचाल दिसली नाही. पाटील हे मृत झाले असावेत, असे समजून त्यांनी कवठेपिरान, दुधगावमार्गे जात कुंभोज पुलावरुन त्यांना वारणा नदीच्या पात्रात टाकले व त्यांची मोटार कोंडीग्रेजवळ सोडून ते पुन्हा कारंदवाडीत आले होते. पोलिसांनी तपास करुन तिघांना अटक केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपअधीक्षक अजित टिके, सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड उपस्थित होते.