नागपूर - अनेकांचे गळे कापले जात असल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेला मांजा चक्क पोलीस चाैकीमागेच बिनबोभाट विकला जात होता. पोलिसांनी मांजा विक्रीच्या या अड्डयावर रविवारी छापा घालून धारदार नायलॉन मांजाच्या ७०७ चकऱ्या जप्त केल्या. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही धाडसी कारवाई केली.
पतंगबाजीच्या नावाखाली कापाकापीचा खेळ खेळतानाच अनेक पतंगबाज निरपराधांच्या जीवांशी खेळतात. पतंग कापण्यासाठी चक्क नायलॉनचा धारदार मांजा वापरतात. या मांजामुळे अनेकांचे गळे कापले जाते. अनेकांचे जीव जाते आणि कित्येकांना जीवघेणी दुखापत होते. पशू पक्षांसाठीही नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरतो. ते लक्षात घेत न्यायालयाने मांजा विक्रीवर आणि साठवणूकीवर बंदी घातली आहे. मात्र, दुसऱ्याच्या जीवाशी खेळणारे गल्लाभरू विक्रेते अजूनही बिनबोभाट मांजा विकतात. चिरीमिरी देऊन कारवाईसुद्धा टाळतात. पाचपावलीतील नाईक तलाव पोलीस चाैकीमागे राहणारा आरोपी आरोपी सुबोध मदनलाल कोहाड (वय ३०) हा जीवघेण्या मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री आणि साठवणूक करतो, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलीस पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार आणि सहायक निरीक्षक पवन मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आरोपी कोहाडच्या घरी रविवारी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास छापा घातला. तेथे प्रतिबंधित नायलॉन मांजाचे घबाडच आढळले. तेथून पोलिसांनी ४ लाख, २४ हजार रुपये किंमतीचा ७०७ चकऱ्या मांजा तसेच मालवाहक ऑटो असा एकूण ६ लाख, २४ हजारांचा माल जप्त केला.
पाचपावली पोलिसांवर संशयज्या ठिकाणी गुन्हे शाखेने कारवाई केली. ते आरोपी कोहाडचे घर पाचपावलीतील नाईक तलाव पोलीस चाैकीमागेच आहे. या चाैकीतील पोलिसांना किंवा पाचपावलीच्या डीबी स्कॉडला, बिट मार्शलला मांजाच्या या घबाडाची माहिती का कळली नाही, असा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. त्याचमुळे पाचपावली पोलिसांवर संशय निर्माण झाला आहे.