मनोर (जि. पालघर) :
हमरापूर-गाळतरे रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या सनरूफमधून आठवर्षीय चिमुकला उभा राहून हिरवेगार डोंगर, शेतीचे दृश्य बघत असताना अचानक त्याच्या गळ्यावर पतंगाचा मांजा आल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. गळा कापल्याने आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथून रविवारी दिशान तिवारी, त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, बहीण हे हमरापूर गाळतरे येथे फिरण्यास आले होते. ते संध्याकाळी कारमध्ये फिरत असताना दिशान कारचे सनरूफ उघडून उभा राहून निसर्ग पाहत होता. अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला. त्याचा गळा कापला गेल्याने मोठी जखम झाली. त्याला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु रक्तस्राव व गळ्याची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती अतिगंभीर होत गेली. पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना आई-वडिलांच्या मांडीवरच त्याची प्राणज्योत मालवली.पतंगाच्या मांजामुळे कापला हॉटेल व्यावसायिकाचा गळापुण्यात मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यात आलेल्या पतंगाच्या मांजामुळे एका हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे (वय २७) असे त्याचे नाव असून वारजे येथील ढोणेवाडाजवळ रविवारी दुपारी हा प्रकार घडला. श्रीकांत लिपाणे हे मोटरसायकलवरून आईला घेऊन पुनावळे येथून जांभुळवाडीकडे सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाडाजवळ रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला. लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी निखिल गोपीनाथ लिपाणे (जांभुळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.