मुंबई - गेल्या वर्षी २३ जून रोजी भायखळा कारागृहात कैदी म्हणून असलेल्या मंजुळा शेट्येला जेल अधीक्षक मनीषा पोखरकरसह महिला जेल पोलीस बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या ६ जेल पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर तिचा जे. जे. रुग्णालयात २४ जूनला मृत्यू झाला. याप्रकरणी प्रथम नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण संवेदनशील असल्याने गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी येत्या सोमवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पथक पाहणीसाठी भायखळा जेल आणि नागपाडा पोलीस ठाण्याला भेट देणार आहे. याबाबत पत्र देखील तुरुंग प्रशासन विभागास प्राप्त झाले असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. उपाध्याय यांनी सांगितले. तसेच या पत्राबाबत पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांना कल्पना देण्यात आली असल्याचे पुढे उपाध्याय म्हणाले.
येत्या सोमवारी दिवसभरात कधीही मंजुळा शेट्ये प्रकरणानंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पथक भायखळा जेल आणि प्रथम गुन्हा झालेले पोलीस ठाणे म्हणून नागपाडा पोलीस ठाण्याला भेट देणार हे नक्कीच आहे. भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येचा जाणीवपूर्वक खूनच केला होता, असं क्राईम ब्रँच तपासात समोर आलं आहे. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट झाल्याचे मुंबई क्राईम ब्रँचने आपल्या आरोपपत्रात नमुद देखील केलं आहे.