नागपूर पोलिसांनी एका शातिर चोराच्या बापाला अटक केली आहे. हा चोर महाराष्ट्रात चोरी करायचा आणि चोरीचे सामान, दागिने, पैसे घेऊन छत्तीसगडला लपायचा. २ दिवसापूर्वी नागपूरच्या मनकापूर इथं राहणाऱ्या मनिष कपाई यांच्या घरी ७७.५३ लाखांची चोरी करून तो छत्तीसगडला पळाला. चोराने हे सगळे पैसे खड्ड्यात लपवून ठेवले. छत्तीसगडच्या राजनांद गावात ही रक्कम दडवली होती.
पोलिसांना या प्रकरणात नरेश अकालु महिलांगे नावाच्या आरोपीचा सुगावा लागला जो राजनांद गावात राहायचा. पोलिसांनी त्याच्या घरी छापेमारी केली परंतु गर्लफ्रेंडसोबत तो आधीच पसार झाला. त्यानंतर एका खड्ड्यातून पोलिसांनी ७७.५३ लाख रुपये बाहेर काढले. पोलिसांनी नरेशचे पिता अकालुला अटक केली. नरेश आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांची दिशाभूल करायचा चोराचा बापनरेश कुमार नागपूरातून चोरी करून चोरलेला माल छत्तीसगडच्या त्याच्या घरी न्यायचा. नरेशच्या बापाला ही बाब माहिती होती. चोरीची कल्पना असूनही बापाने पोलिसांची दिशाभूल केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला नागपूरला आणले. पोरगा चोरी करायचा अन् बाप माल लपवायचा. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंटच्या आधारे नरेश कुमारचा शोध घेतला. पोलीस जेव्हा छत्तीसगडला त्याच्या घरी पोहचली तेव्हा खोलीत बनवलेल्या खड्ड्यात लाखो रुपयांची रोकड लपवून ठेवली होती. नरेशवर वाहनचोरीसह इतर २६ गंभीर गुन्हे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष कपाई यांची साईबाबा नगर इथं मेडिकल उपकरण विक्रीची कंपनी आहे. कपाई कुटुंब काही दिवसांसाठी अमृतसरला गेले होते. त्यावेळी नरेशने बंगल्यात घुसून ७० लाखांची रोकड आणि दागिने चोरले. त्याने कारही चोरली आणि त्यानंतर दारू पिऊन प्रेयसीच्या घरी गेला. प्रेयसी पिंकीला घेऊन त्याने कार रेल्वे पटरीजवळ सोडून छत्तीसगडला पसार झाला. याठिकाणी चोरी केलेली रोकड घरात केलेल्या खड्ड्यात लपवून ठेवली.
गावकऱ्यांसाठी रॉबिनहूड, प्रेयसींची भलीमोठी यादीमनकापूर पोलिसांनी महिलांगेच्या राजनांदगावातील अनेकांची चौकशी केली. तेव्हा हैराण करणारी माहिती समोर आली. बहुतांश लोक गरीब आणि मजूर होते. नरेश त्यांना वेळोवेळी पैसे द्यायचा. उपचार, लग्नासाठी, घर खरेदी, आवश्यक वस्तूसाठी पैसे पुरवत होता. त्यातील कुणीच पैसे परत दिले नाहीत. आरोपीने एका दिव्यांग भिकाऱ्याला ५० हजार रुपये दिले होते. गावकऱ्यांसाठी तो मदत करणारा माणूस अशी प्रतिमा होती. त्याच्या प्रेयसींची भलीमोठी यादी आहे.