जमीर काझी मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा संबंध असल्याच्या निष्कर्षापर्यंत दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) पोहचले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. वाझे यांच्याकडील तपासाचा अहवाल पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविला असून त्यांच्या संमतीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. (Mansukh Hiren murder case; ATS to file case against Sachin Waze soon?)हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने तीन दिवसांपूर्वी वाझे यांची तब्बल १० तास चौकशी केली. त्यात काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी असमाधानकारक दिली. त्यामुळे ते काहीतरी माहिती लपवित असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याच अनुषंगाने १९ मार्चला ठाणे सत्र न्यायालयात होणाऱ्या त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २५ फेब्रुवारीला पेडर रोडवर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाहून ५०० मीटर अंतरावर २० जिलेटीनच्या कांड्या व धमकीचे पत्र सापडलेल्या स्काॅर्पिओचे मालक हिरेन यांचा ५ मार्चला रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळला. याप्रकरणात वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
वाझे -हिरेन पूर्वीपासून संपर्कात व्यापारी मनसुख हिरेन हे पोलिसांचे खबरे म्हणूनही ओळखले जात होते. वाझे यांच्याशी त्यांची खास मैत्री असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांची गाडी वापरणे, तसेच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या विविध आरोपांबाबत वाझे यांना समाधानकारक खुलासा करता आलेला नाही. त्यामुळे ते कारवाईच्या कचाट्यात सापडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...तर एनआयएकडून कारवाई अटळ स्काॅर्पिओत जिलेटीन कांड्या सापडल्याच्या कारणावरून राज्य व केंद्र सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. केंद्राने त्याबद्दलचा तपास एनआरएकडे सोपविला आहे. हिरेन यांच्या हत्येबाबत वाझेंविरुद्ध सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसने कारवाई न केल्यास एनआयए त्यांच्यावर कारवाई करेल, असे निश्चित मानले जात आहे.
जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ! -
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एपीआय सचिन वाझे यांनी आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर केलेली भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्याला काही सहकाऱ्यांकडून अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे. त्यामुळे ते प्रचंड निराशेत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी नकारात्मक विचार सोडावा आणि हे स्टेटस हटवावे, अशी सूचना पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. वाझे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली. त्यामुळे होणाऱ्या टीकेमुळे आपल्यावरील आरोपाला त्यांनी व्हाॅट्सॲप स्टेटसवरून उत्तर दिले. त्यात म्हटले आहे की, ‘३ मार्च २००४ रोजी सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा खोट्या आरोपांखाली अडकविण्यात येण्याची शक्यता आहे’, असे वाझे यांनी पाेस्टमध्ये म्हटले आहे.‘सध्याच्या परिस्थितीत थोडा बदल आहे. आधी हे घडले तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होते. आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्षे शिल्लक होती. मात्र, आता माझ्याकडे नोकरीची आणि आयुष्याचीही १७ वर्षे शिल्लक नाहीत तसेच अशा पद्धतीने जगण्याचे धैर्यही नाही. मला वाटते जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे.’ असे वाझे यांनी पाेस्टमध्ये नमूद केले आहे.