लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ स्फोटकांसह कार सापडल्याचे प्रकरण, त्यातच मनसुख हिरेन यांचा मृत्यू या सर्वच प्रकरणाची चौकशी दहशतवादविरोधी पथकामार्फत (एटीएस) करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली. तत्पूर्वी या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आणि थोड्याच वेळात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची बातमी त्यांनी सभागृहाला दिली तेव्हा सभागृह अवाक् झाले. फडणवीस यांनी हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्याची मागणी केली. या घटनेत हिरेन हे घटनेचे साक्षीदार होते पण त्यांचे संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असा आरोप त्यांनी केला. एका अतिरेकी संघटनेने ही स्फोटके ठेवल्याचा दावा केला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. अनिल देशमुख यांनी एनआयए चौकशीची मागणी फेटाळली. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर विरोधी पक्षनेते उगाच संशय घेत आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडून २४ तासही होत नाही तोच एनआयए चौकशीची मागणी करणे योग्य नाही असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले.सचिन वाझे यांचे नाव विरोधकांकडून का घेतले जात आहे? रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना त्यांनी अटक केली म्हणून का असा सवाल अनिल देशमुख यांनी केल्यानंतर विरोधक संतप्त झाले. वाझेंना आम्ही घाबरत नाही असे फडणवीस व सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सचिन वाझेंशी हिरेनचे मोबाइलवर बोलणे झाले?मनसुख हिरेन यांचे घटनेच्या आधी वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी मोबाइलवर संवाद झाला होता का, अशी शंका फडणवीस यांनी उपस्थित केली. दोघेही ठाण्यात राहतात. वाझे यांच्या नावे नोंद असलेल्या मोबाइलवर हिरेन यांचा अनेकदा संवाद झाला होता असा दावा फडणवीस यांनी केला. मनसुखने त्याची कार नादुरुस्त झाल्याचे म्हटले होते. घटनेच्या दिवशी तो मुंबई पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये कोणाला भेटायला गेला होता असा सवाल त्यांनी केला.