मुंबई : स्फोटक कारच्या गुन्ह्यात मनसुख हिरेन यांनी अटक होण्यास नकार दिल्याने आणि आपले बिंग फुटू नये यासाठी त्यांच्या हत्येचा कट सचिन वाझेने विनायक शिंदेसमवेत रचला होता. त्याच्या ऑडी कारमधून एकत्र प्रवास करीत त्यांनी त्याबाबतचा प्लॅन केला होता, अशी माहिती एनआयएच्या तपासातून समोर आली. वाझे व शिंदे ऑडीतून प्रवास करीत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज वरळी सी-लिंकच्या टोल नाक्यावर सापडले आहेत. ही ऑडी वसई, विरार या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे, त्यामुळे तपास पथकाने गुरुवारी त्या भागात जाऊन शोधमोहीम राबविली.वाझेकडे विविध कारचा ताफा होता. त्यापैकी अनेक इतरांच्या नावावर असून तो त्याचा वापर सोयीनुसार करत होता. एनआयएने मर्सिडीज, इनोव्हा, स्काॅर्पिओ, आउट लँडर अशा एकूण सात गाड्या जप्त केल्या आहेत. त्याशिवाय निळ्या रंगाची ऑडीही त्याच्याकडे होती. बहुतांशवेळा ती ‘सीआययू’मधील त्याचा तत्कालीन सहकारी सहाय्यक निरीक्षक प्रशांत ओव्हाळ आणि अटकेत असलेला विनायक शिंदे यांच्याकडे असायची, अशी माहिती समोर आली आहे.वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावरील २ मार्चच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही ऑडी (एमएच ०४ एफझेड ६५६१) आढळून आली आहे. शिंदे ती चालवित होता, तर वाझे बाजूला बसला होता. टोल देण्यावरून शिंदेचा कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. यावेळी दोघांनी हिरेन यांच्या हत्येचा कट रचल्याची शक्यता अधिकाऱ्यांना आहे. शिंदेने ही गाडी वसई-विरार भागात नेऊन ठेवल्याची माहिती मिळाल्याने तेथे शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मनसुखच्या हत्येचा कट वाझेच्या ऑडी कारमध्ये ? शिंदेसमवेत प्लॅन रचल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 6:36 AM