वसई – ऐन गणपती उत्सवात विरार पूर्वेला भरदुपारी चोरट्यांनी मच्छिमार हाऊसिंग सोसायटीतील तळमजल्यावर असलेली चार घरे एकाच वेळी फोडल्याने मनवेलपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात काही अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोने- चांदी, मौल्यवान वस्तूसह चारपैकी दोन घरातील रोख रक्कमही लंपास केली असल्याने या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या नाकाबंदी व गस्तीपथकाबाबतच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात राहणारे फिर्यादी राकेश जगन्नाथ तरे (वय 47) हे मच्छिमार हौसिंग सोसायटी,रूम नं.02 येथे राहतात. मात्र, ते गणपती दर्शनासाठी गुरुवार दि.14 रोजी आपले अर्नाळा येथील काकांच्या घरी गेले होते. तेथून जेवण आटपून ते दुपारी 3 वाजताच्या सुमारास मनवेलपाड्यात घरी आले असता त्यांना आपल्या घराचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी भयभीत झालेल्या तरे यांनी आपल्या घरात गेल्यावर त्यांना घरातील सर्व वस्तू व लोखंडी कपाट फोडून त्यातील लाखोंचे सोने -चांदी व रोख रक्कम नेल्याचे समजले. त्याचवेळी बाजूला चौकशी केल्यावर इतर तीन रूमची हि कुलूपे तोडली असल्याचे दिसले.तर यामध्ये दुसऱ्या रूममधील जितेंद्र दवणे यांचे हि घर फोडून त्यांच्या घरातील केवळ सहा हजार रुपये चोरीस गेले आहेत. मात्र, राकेश तरे यांचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे सोने चांदी वस्तू सहित रोख रक्कम चोरटयांनीं लंपास केल्याने फिर्यादी तरे यांनी लागलीच विरार पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातांवर घरफोडीच्या गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्य म्हणजे ऐन गणपती उत्सवात व संबंध वसई विरारमध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना चोरट्यांनी तरे यांच्या घरातून लाखोंची जमा पुंजी लंपास केल्याने तरे कुटुंब व इतर शेजारी हवाल दिल झाले आहेत.