कल्याण: कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांकडून वेगवेगळया ठेवीपोटी रककम स्विकारून अॅग्रो मल्टी स्टेट को ऑ सोसायटी लिमिटेड या नावाने सुरू केलेल्या कंपनीत ठेवी स्वरूपात ठेवलेली रककम संबंधितांना परत न करता त्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपाखाली 24 नोव्हेंबरला कंपनीचे चेअरमन अरूण रघुनाथ गांधी (वय 75) यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
गुन्हे शाखेने आतापर्यंत केलेल्या तपासात गांधी याने तब्बल 9 ते 10 हजार गुंतवणूकदारांना गंडा घालून एकूण 23 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपी सध्या कल्याण आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी गांधी हा ठाणे येथील राहणारा असून त्याने सुरू केलेल्या कंपनीचे नाव आधी कालीकाई अॅग्रो मल्टी स्टेट सोसायटी असे होते. दरम्यान ते नाव बदलून सुरू केलेल्या कंपनीत गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. यात कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहणा-या रेखा झोपे यांनीही या कंपनीत काही रोख रककम गुंतवली होती. परंतू त्यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांची एकूण 35 लाख 38 हजार 350 रूपयांची फसवणूक झाल्याने संबंधितांनी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्यात एक वर्षापुर्वी 30 नोव्हेंबर 2020 ला गुन्हा दाखल केला होता. याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. अखेर एक वर्षाने 24 नोव्हेंबर 2021 ला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून आरोपीला ठाणे येथील त्याच्या रहात्या घरातून अटक केली.दरम्यान आतार्पयतच्या तपासात त्याने तब्बल 9 ते 10 हजार गुंतवणूकदारांची अंदाजे 22 ते 23 कोटी रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची माहीती गुन्हे शाखेकडून सोमवारी देण्यात आली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक समीर शेख हे पुढील तपास करीत आहेत.