ठाणे - काल ठाण्यात मराठा आंदोलनादरम्यान नितीन कंपनी उड्डाणपूल आणि पुलाखाली झालेल्या पोलिसांवर दगडफेक, मालमत्तेचे नुकसान, दंगल भडकवल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी चार विविध गुन्हे दाखल केले असून २३ आरोपींना अटक केली. तर कापूरबावडी, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींची संख्या ३६ वर पोहचली आहे. यात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे यांचाही समावेश असून त्यांच्यावर नौपाडा आणि वागळे पोलीस ठाण्यात असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
तब्बल चार तास महामार्गावर नितीन कंपनी उड्डाणपुलाच्या उतरण असलेल्या ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे वाहतुकीचा चक्का जाम झाला. दरम्यान, आंदोलकांची समजूत काढीत आंदोलन संपवले. उपायुक्त डॉ. स्वामी यांनी संयमाने आंदोलकांची समजूत काढली आणि वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, नितिन कंपनी सर्विस रोडवरून तरुणाच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. तोडफोड,दगडफेक, पोलिसांच्या गाड्या तोडफोड, गाड्या उलटविल्याने असे प्रकार घडले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करून पोलिसांनी एका तरुणींसह १२ जणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार, सीसीटीव्ही, आंदोलनाचे केलेले चित्रण मिळवून बुधवारी रात्रीपासून अटकसत्र सुरु केले. सीसीटीव्हीत तोडफोड करताना आढळलेल्या आरोपीना पोलिसांनी वेचून शोधून काढले. पोलीस उपायुक्त डॉ स्वामी यांनी घटनास्थळाच्या कार्यकर्त्यांना बोलावून त्यांना सीसीटीव्ही दाखवून दगड मारणाऱ्या तरुणाची ओळख पटवून ११ जणांना अटक करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या २३ वर पोहचली. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती डॉ. स्वामी यांनी दिली. प्रत्येक सीसीटीव्ही आणि फोटो, सोशल मीडियावरील चित्रफितीतून दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांची ओळख पाठविण्याची मोहीम सुरु आहे. दुसरीकडे याच आंदोलनात तोडफोड, दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माजिवडा उड्डाणपुलावर टायर जाळल्याप्रकरणी १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर कापूरबावडी नाक्यावर रातारोको केल्याप्रकरणी १०० जणांपेक्षा जास्त लोकांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात बस तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एक गुन्हा तोडफोड, सरकारी मालमत्तेचे नुकसान दगडफेक असा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चार गुन्ह्यात १३ आरोपींना अटक करण्यात आलेली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.