नवी मुंबई - कोपर खैरणे येथे मराठा आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी या आंदोलनाचा फायदा घेत गावातील पूर्ववैमनस्यातून जाळपोळ केली. समाजात तणाव निर्माण झाल्यानंतर मारहाणीत जखमी झालेला तरुण रोहन तोडकर (वय - १९) याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचा मृतदेह आज साताऱ्यातील पाटण तालुक्यातील खोनोली या मूळ गावी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला असून कायदा, सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये म्हणून साताऱ्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
रोहन तोडकर हा साताऱ्यातील पाटण तालुक्यातील चाफळ खोनोली गावचा आहे. तो कोपरखैरणे येथील सेक्टर - १५ मध्ये राहत होता. २५ जुलै रोजी महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले होते. दरम्यान नवी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी कोपरखैरणे गावात पोलिसांनी कर्फ्यू लावला होता. संपूर्ण नवी मुंबईत इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनाचा फायदा घेत समाजातील दोन गटातील वाद पूर्ववैमनस्य मनात उफाळून आला होता. २००५ साली देखील असाच वाद निर्माण होऊन गंभीर परिस्थिती या परिसरात निर्माण झाली होती. पूर्वीचा राग मनात ठेवून काही समाजकंटकांनी कोपरखैरणे गावातील वाहने जाळली, दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. मात्र, बदला घेण्यासाठी सायंकाळी दुसरा गट गावात पुन्हा दंगल परिस्थिती निर्माण करण्यासाठी आला असता दोन गटात हाणामारी झाली आणि त्यात रोहनला जबर मार लागला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच रोहनच्या डोक्याला, हाताला आणि पायाला खूप मार लागला होता. उपचारासाठी त्याला नवी मुंबईतील नवी मुंबई कॉर्पोरेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रोहनची तब्येत सुधारण्याऐवजी खालावत चालली असल्याने त्याला मध्यंतरी २. १५ वाजता जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रोहनची परिस्थिती चिंताजनक असल्याने तो उपचारास प्रतिसाद देत नव्हता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात भा. दं. वि. कलम ३०२ आणि दंगल भडकविणे असा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
त्याचा मृतदेह सकाळी साताऱ्यात पाटण येथे नेण्यात आला. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्नाम होते. मुंबई येथे रोहन तोडकर पोलिसांच्या लाठीमारात जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मृतदेह ताब्यात न घेण्याचा गावकऱ्यांनी पवित्रा घेतला आहे. गावकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटात निर्माण झालेल्या हाणामारीत रोहनचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या लाठीमारात कि हाणामारीत रोहनचा मृत्यू झाला? असा सवाल उपस्थित झाला आहे.
http://www.lokmat.com/navi-mumbai/mumbai-bandh-injured-protester-dies-mumbai-hospital/