महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो न ओळखल्याबद्दल एका मराठी अभिनेत्रीने चौकीदाराला मारहाण केली. मुंबईतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चौकीदाराला मारहाण करणारी महिला मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. मालाडच्या मालवणी पोलिसांनी या अभिनेत्रीला नोटीस दिली आहे. या अभिनेत्रींचे नाव दीपाली मोरे असं आहे.
मालाड पश्चि येथे असलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईच्या मढ भागात जाऊन चौकीदाराला मारहाण करत होते. तसेच त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल केला. यानंतर पीडित चौकीदार दयानंद गौड याने मालवणी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 452,385,323,504, 506,34 अन्वये गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे.
चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याबाबत सांगितले की, चौकीदार नीट वागत नव्हता. वास्तविक मराठी निर्माते, दिग्दर्शक आणि एक मराठी अभिनेत्री शूटिंगसाठी जागा पाहण्यासाठी मढ परिसरातील एका बंगल्यात गेले होते. तेथे असलेल्या चौकीदाराने आतमध्ये शूटिंग चालू आहे असे सांगून त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यानंतर, मराठी अभिनेत्रीने राज ठाकरेंचा फोटो चौकीदाराला दाखवला आणि ती मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगितले. चौकीदाराने फोटोमध्ये राज ठाकरे यांना ओळखत नाही. मुंबईत राहून राज ठाकरे यांना ओळखत नाही, असे सांगत अभिनेत्रीने चौकीदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
उलटपक्षी चौकीदाराने त्याच्या तक्रारीत त्याच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणीही करण्यात आली होती असं म्हटलं आहे. तर चौकीदाराचा हा पैसे मागण्याचा दावा व्हिडिओमध्ये चित्रित झालेला नाही. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चौकीदाराकडून खंडणीची मागणी कोण करणार? या सर्व आरोपांमागे राजकारण आहे, असं सांगत आरोपाचे खंडन केले.