मुंबई - वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ९० नजीक असलेल्या श्रीराम मिल सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये जास्त माणसं भरल्याच्या क्षुल्लक वादावरुन एका ५३ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. महेंद्र सारंगकर असं या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच मोहित शुक्लाला देखील मारहाण करण्यात आली. याबाबत वरळी पोलीसांना २ डिसेंबरला माहिती मिळाली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर ३ डिसेंबरला दोन्ही जखमींनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
मोहित शुक्ला यांच्याकडे घरगुती कार्यक्रम होता असल्याने सोसायटीच्या लिफ्टमधून जास्त लोकं ये - जा करत होती. त्यावेळी जास्त लोकं लिफ्टमधून ये - जा करू नका असं सारंगकर यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे सारंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा हा वाद सुरु होता तेव्हा सारंगकर यांच्या हातात एक लहान बाळ होतं. त्यामुळे त्यांना प्रतिकार करता आला नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र, वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरपे यांनी दोघांना इजा झाली असून दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे ते म्हणाले, दोघांनाही उपचार करून रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.