बीड: आष्टी तालुक्यातील बाळेवाडीत कापसात गांजाचे आंतरपीक घेणाऱ्या शेतात छापा टाकल्याच्या कारवाईचा ४८ तास उलटत नाहीच तोच नेकनूर (ता.बीड) येथे गांजा साठवून ठेवणाऱ्रूा दाम्पत्याच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. १० डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, एमपीडीए कारवाईनंतर कारागृहातून सुटताच गांजा तस्करीकडे वळालेला आरोपी फरार असून त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले.
बबन शामराव पवार , सत्यभामा बबन पवार (दोघे रा.नेकनूर) अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. बबन पवारवर हातभट्टी दारु बनविणे, विक्री करणे, जवळ बाळगणे याचे पाच गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव नेकनूर पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षकांना पाठवला. पोलिस अधीक्षकांकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्रूांना सादर झाला.
१४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर त्याच दिवशी बबन पवारला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबध्द केले होते. दरम्यान, एमपीडीएनुसार कारवाई केल्यावर गृहविभागाकडून १२ दिवसांच्या आत मान्यता घ्यावी लागते. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबरला दिलेला प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला. कक्षाधिकारी देवेंद्र चंदेल यांनी प्रस्ताव अमान्य करत बबन पवारची स्थानबध्दतेतून सुटका करण्याचे आदेश २६ नोव्हेंबरला दिले. ६ डिसेंबरला बबन पवार कारागृहाबाहेर आला, त्यामुळे प्रशासनावर नामुष्की ओढावली होती.
खाटाखाली दडविला होता गांजा
कारागृहातून सुटताच बबन पवारने गांजाच्या धंद्यात प्रवेश केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ यांना मिळाली होती. धाडीत पत्र्याच्या शेडमधील एका खाटेखाली निळ्या रंगाच्या बॅगेत एक लाख १६ हजार ६९० रुपये किमतीचा ११ किलो ६६९ ग्रॅम गांजा आढळून आला. तो जप्त केला असून सत्यभामा पवार ताब्यात आहे तर बबन पवार हा फरार आहे. त्या दोघांवर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू , गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १० डिसेंबर रोजी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक उपनिरीक्षक वचिष्ठ कांगणे, संजय जायभाये, हवालदार कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, नसीर शेख, गणेश मराडे, देवीदास जमदाडे, शुभांगी खरात यांचे पथक पो.नि. सतीश वाघ यांनी रवाना केले. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या सहकार्याने सायंकाळी बबन पवारच्या घराची शासकीय पंचांसमक्ष झडती घेेतली.