यवतमाळ/मंगरुळ: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच भांबराजा येथील सरपंच महिलेचे पती असलेल्या शिवसैनिकावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून कुऱ्हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात संचालक सुनील नारायण डिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. भांबराजा येथे झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सुनील डिवरे हे गुरुवारी सायंकाळी यवतमाळवरून भांबराजा येथे परतले. घराच्या अंगणात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हावरून तीन जण आले. त्यापैकी एकाने ॲक्टीव्हा सरळ करून ठेवली. उर्वरित दोघांनी डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर घाव घातले. काही कळायच्या आत हे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यावेळी आरडाओरडा ऐकून डिवरे यांच्या पत्नी अनुप्रिया घरातून अंगणात धावत आल्या. सुनील डिवरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. हा सर्व घटनाक्रम ७.३० वाजताच्या दरम्यान घडला. सरपंच अनुप्रिया यांनी आरडाओरडा करीत मदतीसाठी धावा केला. ग्रामस्थ तत्काळ जमा झाले. सुनील डिवरे यांना वाहनात टाकून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यवतमाळ तालुक्याच्या राजकारणात प्रस्थ असलेले सुनील डिवरे हे बाजार समितीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी अनुप्रिया या भांबराजा येथील सरपंच आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुनील डिवरे यांनी एकहाती सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून त्यांची राजकीय वर्तुळात दखल घेतली जात होती. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी डिवरे यांचा गावातील विरोधी गटासोबत मोठा वाद झाला होता. सातत्याने डिवरे व त्यांच्या विरोधीगटात संघर्ष होत होता.
१५ वर्षाचा मुलगा घटनेचा प्रत्यक्षदर्शी, मारेकरी गावातील सुनील डिवरे यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या तिघांनी सर्वप्रथम कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर त्याच्या पोटात बंदुकीतून गोळी झाडली. डिवरे जागेवरच गतप्राण झाल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी हवेतही राऊंड फायर करीत जल्लोष करून तेथून पळ काढला. हा सर्व घटनाक्रम डिवरे यांचा १५ वर्षाचा मुलगा दाराआडून बघत होता. मारेकरी हे गावातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातूनच हा वचपा काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गावात तणावाची स्थिती, विरोधकाच्या घरापुढे जमाव
खुनाच्या घटनेनंतर भांबराजा येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. डिवरे समर्थक विरोधकांच्या घरावर धावून जात आहे. या ठिकाणी राखीव पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. यवतमाळ रुग्णालयातही गर्दी जमली होती.