ठाणे - कॅलिफोर्निया येथील घराचे कर्ज फेडण्यासाठी दोन कोटींच्या रकमेची मागणी करून ती न दिल्याने अंकिता मोटवानी हिचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिचे वडील भगवान पमनानी यांनी याबाबतची तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
पमनानी यांनी तक्रारीत आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कैफियत मांडली आहे. अंकिताचा विवाह धनंजय मोटवानी याच्याशी २४ डिसेंबर २०१८ ला नाशिकला झाला. लग्नापूर्वीच सासू हेमलता यांनी त्यांच्या मुंबईतील वर्सोवा येथील घरासाठी ४० लाखाच्या रकमेचा खर्च करण्यास भाग पाडले. त्याबदल्यात केवळ सहा लाखाची रक्कम परत केली. विवाहाची तारीख जशी जवळ येत गेली तशा मागण्या आणखी वाढल्या. २१ डिसेंबर २०१८ ला सासरच्या मंडळींनी सोन्याची नाणी, सोनसाखळी व धनंजय यांना महागडे घड्याळ आणि दागिने देण्याची मागणी केली. लग्न मोडू नये म्हणून विवाहाच्या दिवशी २० सोन्याची नाणी आणि चेनही त्यांनी दिल्या. त्यानंतर किमती वस्तू हुंडा स्वरूपातही घेतल्या.अंकिताच्या लग्नानंतर धनंजय याने त्याच्या कॅलिफोर्निया येथील घराचे कर्ज फेडण्यासाठी दोन कोटींची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्याने तिचा छळ केला. तिला घर सोडण्यास भाग पाडले. त्याआधी गर्भपातासाठीही तिच्यावर पतीने दबाव टाकला. दरम्यानच्याच काळात तिला मारहाणही झाली. सासरी होणारा त्रास असहाय झाल्याने २६ एप्रिल २०२० पासून ती माहेरी भारतात परत आली.पतीचा घटस्फोटासाठी अमेरिकेत दावाअंकिताचा छळ करून तिला कोणतीही नोटीस न देता पतीने अमेरिकेत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याचेही समजले. अखेर याप्रकरणी मोटवानी कुटुंबीयांविरुद्ध हुंडाबंदी तसेच ४९८ अ नुसार गुन्हा पमनानी यांनी २ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे.