मुंबई : अवघ्या १२ वर्षांच्या मुलीशी २८ वर्षांच्या तरुणाचा त्या मुलीच्या कुटुंबीयांच्या संमतीने बालविवाह करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या संबंधात चारकोप पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत नवऱ्याला अटक केली आहे. ही मुलगी गरोदर राहिल्याने तिचा विवाह करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या अल्पवयीन मुलीचा विवाह बिहारमध्ये जानेवारीत करण्यात आल्यानंतर ती नवऱ्यासह मुंबईत चारकोप भागात राहावयास आली. तेथे भाडेतत्त्वावर घर घेऊन ते राहत होते. या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिचा पती तिला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मुलगी गरोदर असून अल्पवयीन असल्याचा संशय त्यांना आला. तेव्हा याची माहिती त्यांनी चारकोप पोलिसांना दिली.
परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती बागूल-भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पुढील चौकशी सुरू केली. तेव्हा या मुलीचे वय अवघे १२ वर्षे ७ महिने आणि २३ दिवस असल्याचे उघड झाले. त्यानंतर, आरोपींविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत लगेचच त्याला अटक करण्यात आली.
दोन्ही कुटुंबीयांवर कारवाई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते आता या प्रकरणात गुंतलेल्या दोन्ही कुटुंबांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. ज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणे समाविष्ट असू शकते. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.तपासादरम्यान समजले की आरोपी हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा तिचा नवरा आहे. ते १९ जूनपासून भाड्याच्या घरात राहायला आले. त्याने सरकारी रुग्णालयात दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला, असेही अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रमुख रूपाली चाकणकर यांनी सोमवारीच लातूरमधील एका पत्रकार परिषदेत कोविड-१९ च्या लॉकडाऊननंतर राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.