बिहारच्या गोपाळगंजमध्ये एका लग्न समारंभात जोरदार राडा झाला. डीजेवर डान्स करत असताना वराती आणि गाववाल्यांमध्ये भांडण सुरु झाले. यावेळी नवरदेवाचा भाऊ आणि भाच्याला मारहाण करण्यात आली. या हाणामारीत आणखी दोघे जखमी झाले. यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या राड्यानंतर वरातीतले लोक नवरदेवाला तिथेच सोडून पळून गेले.
हाजियापूर मोहल्ल्याच्या फुलवरीयातील जटहा गावात वरात गेली होती. डीजेवर नाचत असताना काही गावकऱ्यांचे आणि वरातीतील लोकांचे खटके उडाले. याची परिणीती हाणामारीत झाली. दोन्ही बाजुंनी लाथा, बुक्क्यांचा प्रसाद देण्यात आला. नवरदेव सुनील बासफोर याने सांगितले की, माझ्या भावाला आणि भाच्याला मारहाण झाली. तर गाववाल्यांनी सांगितले की, भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली, परंतू वरातींनी कोणाचेच ऐकले नाही आणि वरात घेऊन माघारी गेले.
जखमी झालेल्या अनिल बांसफोर याने सांगितले की, डीजे बंद केल्यानंतर 20 ते 25 जणांच्या गटाने आमच्यावर हल्ला केला. घरी ठेवलेल्या खुर्च्या आणि टेबल देखील तोडले. ते कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. या राड्यामुळे लग्नाचे विधी थांबले. नवरीच्या आईने सांगितले की, वरातीचे स्वागत करण्यात आले होते, नवरदेवाला हारही घालण्यात आला होता. यानंतर नवरदेव वरात घेऊन त्यांची व्यवस्था केलेल्या घरी गेला, तिथेच हा वाद झाला. यानंतर ते माघारी गेले. आता माझ्या मुलीशी लग्न आणि केलेला खर्च कोण देणार, असा सवाल केला होता.
या प्रकरणी पंचायत बोलविण्यात आली होती. वराकडून कोणतीही पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दोन्ही पक्षांना समजावले यानंतर नवरदेव नवरीला घेऊन जाण्यास तयार झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सारे विधी करण्यात आले आणि नवरी तिच्या सासरी नांदायला गेली.