पाटणा - प्रेमात पडलेल्या युगुलांचं एकच स्वप्न असतं, ते म्हणजे लग्न करून आपलं नातं अधिक पक्क करण्याचं. त्यासाठी अनेक युगुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबीय आणि समाजाचा दबाव झेलावा लागतो. एवढं होऊनही काही नशिबवान जोडपी कायमची एकमेकांची होऊन जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा प्रेमकहाणीबाबत संगणार आहोत, जिच्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. एका प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी आक्षेपार्ह स्थितीत पकडले. त्यानंतर ग्रामस्थांनी त्या दोघांचा विवाह करून देण्याचा निर्णय घेतला. अखेरीस काही तासांतच हे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकमेकांचे पती-पत्नी होऊन गेले.
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील धरथरी पोलीस ठाणे क्षेत्रातील कछीयावां गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. गावातील खंधा येथे ग्रामस्थांनी एका जोडप्याला आपत्तीजनक अवस्थेमध्ये पकडले. त्यानंतर दोघांचेही जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. यादरम्यान, या तरुणाने लग्नाला विरोध केला. मात्र ग्रामस्थांनी त्याचे म्हणणे ऐकले नाही.
हा तरुण जबरदस्तीने विवाह करण्याला विरोध करत होता. मात्र ग्रामस्थांच्या भीतीमुळे त्याने या तरुणीच्या डोक्याला कुंकू लावले. ग्रामस्थांनी सांगितले की, शेतामध्ये दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले होते. त्यानंतर तिथे गर्दी जमली. हा जमाव या दोघांनाही जबरदस्तीने पकडून गावातील सूर्य मंदिरात घेऊन गेला. तिथे दोघांचंही जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. सदर युवक लग्नाला तयार नव्हता. युवती मात्र लग्न करण्यास तयार होती.
सदर तरुण हा जहानाबाद जिल्ह्यातील करनौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखदूमपूर गावातील रहिवासी आहे. त्याची बहीण ही कछीयावां गावात राहते. तिथेच या तरुणाची ओळख एका तरुणीशी झाली. त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. दोघेही लपून एकमेकांना भेटत. दरम्यान, ते रंगेहात पकडले गेले. अखेर त्यांना लग्न करावे लागले.