लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. वसंत कुळकर्णी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. आरोपी सर्व शिक्षा एकत्र भोगेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.राजू मोहनलाल यादव (२७) असे आरोपीचे नाव असून तो बिसापूर, जि. सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो कळमना येथे राहत होता. त्याचे दोन साथीदार अमन ऊर्फ शेंकी देवेंद्र जनबंधू (२३) व सायना खान ऊर्फ पूजा मेश्राम (३०) यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. ही घटना २०१६ मध्ये घडली होती. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून पीडित महिलेला जाळ्यात फसविले. त्यानंतर तिला राजस्थान येथे नेले. तिचे खोटे आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार केले आणि कोटा येथे एका व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. काही दिवसांनी महिलेस पतीला फोन करण्याची संधी मिळाली. परिणामी, पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून महिलेला घरी परत आणले. तिच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारने आरोपींविरुद्ध सहा साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.
विवाहितेचे अपहरण प्रकरण : आरोपीला साडेतीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:23 PM
सत्र न्यायालयाने विवाहितेचे अपहरण व अन्य विविध गुन्हे करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निकाल